09/01/2026
आमचे एक परिचित गृहस्थ आहेत. आता वयाने असतील ८०-८२. ते सत्तरीत असतांना त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्ने झाली होती. दोघेही आपापले संसार सांभाळण्यात मग्न होते.
#कथाविश्व
पत्नीच्या मृत्यूनंतर काही दिवस हे गृहस्थ आपल्या मुलाकडे राहिले. सुनेला सासऱ्यांची उठबस करणे त्रासदायक वाटायला लागले. सासरेबुवांनाही कामाची फारशी सवय नव्हती. प्रत्येक गोष्ट आजवर बायको हातात देत होती. आता सुनेला ते करायला लागत होते. सुनेची कामे वाढली. रोजची कुरबुर होऊ लागली. शेवटी सासरेबुवा परत आपल्या घरी एकटे राहायला लागले. मुलीच्या घरी जाऊन राहणे त्यांना पसंत नव्हते. मुलीनेही त्यांची जबाबदारी घेण्याचे टाळले.
आता त्यांची सगळीच पंचाईत झाली. स्वयंपाक करता येत नव्हता. रोजचे बाहेरचे जेवण तब्येतीला त्रासदायक ठरत होते. शेवटी त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले. मुलांना त्रास न देता स्वत:ची सोय लावण्याचा हेतू त्यात होता.
थोडे व्यंग असल्याने लग्न न झालेली एक गरीब घरातील वयस्कर स्त्री त्यांच्याशी लग्नाला तयार झाली. तिलाही आधार मिळाला. पोटभर अन्न आणि कपडालत्ता, चांगले घर तिलाही मिळाले. यांचीही जेवणाची सोय झाली.
पण..
त्यांची दोन्ही मुले या व्यवस्थेवर नाखूष होती. 'आमच्या आईच्या जागी यांनी ही कोणती बाई आणली' म्हणून दोघेही चिडले. मुलीने सगळे संबंध तोडून टाकले. 'सासरच्या माणसांसमोर नाचक्की झाली, या कारणाने तिने यांच्याशी बोलणे सुद्धा टाकले. मुलाने स्पष्ट सांगितले की, "तुम्हाला कधी यावेसे वाटले तर या पण या बाईला माझ्या घरात आणायचे नाही."
यांनीही "ती माझी आता बायको असल्याने तिला टाकून मी तुझ्या घरी येणार नाही." असे ठणकावून टाकले.
म्हातारा म्हातारी आता एकटेच राहतात. यातला एक गेला की दुसरा परत निराधार होईल.
आणखी एक परिचित आहेत. या दुसऱ्या पंचाहत्तरीच्या गृहस्थांची पत्नी अचानक निवर्तली. यांना एकच मुलगी. तिचे लग्न होऊन ती मुंबईत आपल्या नवरा, मुलीबरोबर राहते. यांच्या पत्नी हयात असतांना एकदा आजारपणात दोघेही मुलीकडे काही दिवस राहायला गेले. जावई कामावरून आला की चिडचिड करायचा. लहान मुलीवर राग काढायचा. सासू-सासऱ्यांचा लांबलेला मुक्काम त्याला त्रास देत होता. यांनी आपले चम्बूगबाळे आवरले आणि परत घरी आले.
अशा परिस्थितीत, पत्नी गेल्यावर त्यांना आता मुलीकडे जाणे नको वाटले. गडगंज पैसा अडका असल्याने घरात सगळ्या कामांना नोकर माणसे होती. पण यांचे पाय काम करत नसल्याने कायम एका जागेवर बसून राहत होते. नोकर मंडळी कामे करून गेल्यावर बाहेरून कोणी आले तरी त्यांना जागेवरून उठून दार उघडण्याचा त्रास व्हायचा.
एकदा आम्हां ओळखीच्या काही मंडळीना त्यांनी घरी बोलावले. आम्ही गेल्यावर एका वयस्कर स्त्रीने दार उघडले. त्यांच्याशी काकांनी आमची ओळख करून दिली. त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला तो निर्णय सांगण्यासाठी त्यांनी बोलावले होते.
आपल्या निर्णयाचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की गेले काही दिवस त्यांना एकटेपणा फारच बोचायला लागला होता. एखादे पुस्तक वाचले किंवा एखादी सीरिअल बघितली तरी त्याबद्दल कोणाशी बोलायला पण कोणी जवळ नसल्याने त्यांचा भावनिक कोंडमारा व्हायला लागला होता.
त्या बाई आत आमच्यासाठी चहा करण्यासाठी गेल्या असतांना मी त्यांच्याशी बोलत होते. त्यांनी आपली सगळी माहिती सांगितली. सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या होत्या त्या. हा धाडसी निर्णय त्यांनी कसा घेतला त्याबद्दल त्यांनी सांगितले. त्यांचे पती काही वर्षांपूर्वी गेल्या नंतर त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आपापल्या संसारात गुंतले होते. यांनीही एकटे राहण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:ला समाजकार्यात त्यांनी गुंतवून घेतले होते. सगळे छान चालले होते. मुले अधून अधून येऊन त्यांची चौकशी करून जात होती.
एकदा त्यांना खूप ताप भरला. मुले येऊन भेटून गेली. त्यांच्या त्याच औषधे घेत होत्या. मुलांनी आणून दिलेली फळे, शेजारच्यांनी दिलेला मऊ भात खाल्ला तर खाल्ला नाही तर इच्छा होत नाही म्हणून न जेवताही झोपत होत्या. पाणी हवे असले तरी कधी उठून घेण्याचेही त्राण नसायचे अंगात.
त्या वेळी त्यांना जाणवले की इतर वेळी नाही पण अशा आजारपणात कोणी तरी हवे, जे कपाळावर हात ठेवेल. आग्रहाने काहीतरी खायला लावेल. आठवणीने वेळच्यावेळी औषध हातात देईल. आणि त्याच वेळी त्यांच्या मैत्रिणीने या काकांची परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांच्याबद्दल यांना सहानुभूती वाटली. आणि दोघांनी मिळून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्या वयाच्या एका स्त्रीच्या दृष्टीने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे हा फारच धाडसी निर्णय होता खरा. कारण या वयात सहसा स्त्री लग्नाचा विचारही करत नाही. नातवंडे झालेली असतांना आजीचे लग्न हे अवती भोवतीच्याना तर मान्य होणारच नाही पण स्वत: तिलाही कितपत रुचेल आणि पचेल हे सांगता येणार नाही. त्यातही आजवर एका नवऱ्याची तंत्रे सांभाळली. त्याच्या स्वभावातल्या खाचाखोचा, कंगोरे माहित झाल्याने जमवता आलेले होते आजवर. आता हा नवा माणूस कसा असेल? त्याच्याशी या वयात जमवून घ्यायचे म्हणजे कठीणच वाटू शकते एखादीला. म्हणून असेल कदाचित, या दोघांनी लग्न न करता काही काळ तरी एकत्र राहून बघण्याचे ठरवले असावे. स्वभाव जमतात की नाही ते कळेल काही काळातच.
त्या बाईंच्या मुलांना हे मान्य होते की नाही माहित नाही पण या काकांचा जावई मात्र भयंकर चिडला. त्याने यांच्याशी संबंध तोडले. यांच्या मुलीलाही तोडायला लावले.
पूर्वी म्हण होती, 'आई जेवू घालत नाही आणि बाप भिक मागू देत नाही.' आता आईबापांवरच असे म्हणायची परिस्थिती आली आहे. मुलांनी सांभाळायचे पण नाही,
आणि आईवडिलांनी त्यांची काहीतरी सोय लावून घेतली तर ते पण चालणार नाही.
© मेघा अविनाश कुळकर्णी
कथाविश्व - गोड कौटुंबिक कथांचे विश्व 🎉✨